- दोन मंडळांवर गुन्हे दाखल; स्पीकरसह साहित्य जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरगाव-परंदवडी | २२ सप्टेंबर २०२६ :- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर कारवाई केली आहे. चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ ते २६ सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक ठिकाणी उच्च आवाज क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजे चालक-मालकांना यापूर्वी लेखी सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले होते.
२० सप्टेंबर रोजी सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन्ही मंडळांनी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०, २९३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत ८ डीजे स्पीकर, २ डीजे मिक्सर, २ अॅम्प्लीफायर आणि १ वाहन जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

















