न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २५ सप्टेंबर २०२६) :- इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवत एका ३४ वर्षीय महिलेची तब्बल आठ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना काळेवाडी परिसरात समोर आली आहे.
याप्रकरणी काळेवाडी येथील महिला (वय ३४) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इन्स्टाग्रामवरील आयडीचा वापर करणारा तसेच इन्स्टाग्राम अकाउंटधारक साहिल वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून फिर्यादीशी संपर्क साधून ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तसेच जास्त पैसे असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. भावनिक बोलून आणि वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने फिर्यादीकडून पैसे मागितले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने ऑनलाइन माध्यमातून एकूण ८ लाख १४ हजार रुपये पाठवले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


















