न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२६) :- हायवा टेम्पो चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सुमे माळा, वडमुखवाडी सेल पेट्रोल पंपासमोर, तळवडे परिसरात घडला.
या प्रकरणी धीरज युवराज चिकटे (वय २७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हायवा चालक कमलेश नारायण एकडे (वय २६, रा. मोहननगर, गोदाम चौक, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, धीरज चिकटे हे त्यांचा मित्र विशाल चौगुले याच्यासोबत मोटारसायकलवरून कामावरून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून आलेल्या हायवा टेम्पोने चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवत मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली. विशाल चौगुले यांच्या उजव्या हाताला, पायाला व डोक्याला मार लागला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

















