- एका अधिकाऱ्याची खासगीत धक्कादायक कबुली..
- कचऱ्यामुळे शहराच आरोग्य धोक्यात?..
- मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर कचरा प्रक्रियेला ब्रेक…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूसह विविध आजारांचे प्रमाण वाढत असताना शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वातावरणातील बदलाबरोबरच शहरात ठिकठिकाणी साचणारा कचरा आणि त्याची प्रभावी विल्हेवाट न लागणे हेही रोगराई पसरण्यामागील प्रमुख कारण ठरत असल्याची चिंता एका महापालिका अधिकाऱ्याने खासगीत व्यक्त केली आहे. मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद असल्याने कचऱ्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विस्कळीत झाल्याने परिस्थिती गंभीर बनल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
“कचरा उचलला जात असला तरी त्याचे विघटन आणि शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत नाही. मोशी प्रकरण अद्याप पूर्णपणे रुळावर आलेले नाही. त्यामुळे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. त्याचा परिणाम शहराच्या आरोग्यावर होत असून, आज शहरात राहण्यायोग्य वातावरण राहिलेले नाही,” अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने ‘न्यूज पीसीएमसी’च्या प्रतिनिधीला खासगीत बोलताना दिली.
नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर यंत्रणा हादरली…
मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प २०२३ पासून सुरू होता. मात्र, ८ जुलै २०२६ रोजी या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद असल्याने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
उपनगरांमधून दररोज संकलित होणारा कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी त्यानंतर त्याचे प्रभावी विघटन, प्रक्रिया आणि अंतिम विल्हेवाट या साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याशी जोडला गेला आहे.
दहा ठिकाणी नवी केंद्रे; प्रत्यक्ष अंमलबजावणीला मात्र विलंब…
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत शहरात विविध ठिकाणी अत्याधुनिक आणि दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात दहा ठिकाणी कचरा संकलन केंद्रांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, या केंद्रांची प्रत्यक्ष उभारणी आणि कार्यान्वयन होण्यासाठी अद्याप मोठा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मोशी येथील यंत्रणा पूर्ववत होण्यापूर्वी किंवा पर्यायी कचरा प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित होण्यापूर्वी शहरातील कचरा व्यवस्थापनाचा तात्पुरता प्रश्न कसा सोडविला जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कचऱ्याचा प्रश्न आता आरोग्याच्या दारात…
शहरातील कचरा, त्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट या संपूर्ण व्यवस्थेतील अडथळ्यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डेंग्यू आणि इतर आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाकडे केवळ स्वच्छतेचा विषय म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

















