न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासमोर सार्वजनिक रस्त्यावर कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई निगडी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) केली.
बलदेवसिंग मचुसिंग टाक (२०, रा. अहिल्यानगर) आणि मुजम्मिल मोबिन पठाण (२१, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात शस्त्रे व धारदार हत्यारे बाळगण्यास मनाई असतानाही आरोपींकडे लोखंडी कोयता आढळून आला. तसेच त्यांच्या ताब्यातील रिक्षामध्ये लोखंडी चॅनलचे वेल्डिंग केलेल्या फ्रेमचा भंगार माल आढळला. या मालाबाबत आरोपी समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नसल्याने तो चोरीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, आरोपी मुजम्मिलकडे रिक्षा चालविण्याचा परवाना नसतानाही त्याने रिक्षा भरधाव व निष्काळजीपणे चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी फिर्याद दिली असून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


















