न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील ‘ब’ ते ‘ड’ गटातील अधिकारी व कर्मचा-यांच्या मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या. मात्र, ५५ अधिकारी व कर्मचारी बदलीच्या विभागात अद्याप रुजू झालेले नाहीत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करीत गैरवर्तन केल्याने ५५ जणांचे जून महिन्याचे वेतन देऊ नये, असा आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि. १९) रोजी दिला आहे.
पालिका प्रशासन विभागाने ‘ब’ ते ‘ड’ गटांतील शंभरहुन अधिक अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या होत्या. संबंधित प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने या बदल्या करण्यात आल्या. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्व विभागांचे पर्यायी कर्मचारी हजर होण्याची वाट न पाहता बदली झालेल्या कर्मचा-यांना तत्काळ कार्यमुक्त करुन, प्रशासन विभागास कळविले. परंतु, अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निर्दशनास आले. तब्बल ५५ जण बदली झालेल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत.
अनेक जण वैद्यकीय रजा टाकून गैरहजर राहत आहेत. तसेच राजकीय दवाब आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचायांचे जूनपासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीत बदलीपुर्वी यांच्या विभागाकडून काढण्यात येऊ नये. संबंधित अधिकारी व कर्मचारी या दृष्टीने बदलीच्या विभागात हजर झाल्यानंतरच संबंधित विभागातून वेतन काढावे, अशा सूचना प्रशासन विभागाने दिल्या आहेत.















