- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. १ ऑक्टोंबर २०२६) :- महाळुंगे इंगळे परिसरात तरुणावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या चार तासांत ताब्यात घेतले. पारंपरिक तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत ही कारवाई केली.
राहुल शामकुमार निषाद (वय २३, रा. महाळुंगे मूळ. उत्तर प्रदेश) हा ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जावळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होता. महाळुंगे स्मशानभूमीजवळ आरोपी ओम चंद्रकांत बहादुरे आणि अनिल रामराव आघाडे यांनी त्याच्यावर हल्ला केला. दोघांनी राहुलच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी राहुलच्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पारंपरिक तपासासोबत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. गुन्हा करून पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना चार तासांच्या आत ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी आणि सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.


















