- सर्व संप्रदायातील श्रावक-श्राविका व साध्वीजींना एकत्र आणण्याचा उपक्रम स्तुत्य..
- परमपूज्य सुप्रियादर्शनाजी म सा यांचे गौरवोद्गार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानच्या सभागृहात पिंपरी-चिंचवड जैन महासंघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चिंचवडगाव आणि कल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व संप्रदायातील जैन श्रावक-श्राविका आणि साध्वीजींचा सामूहिक क्षमापना कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ परमपूज्य विनीतयशाश्रीजी म सा यांच्या मंगलाचरणाने झाला. जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस अशोककुमार पगारिया यांनी महासंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व संप्रदायातील श्रावक-श्राविकांना एकत्र आणून सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाचा कार्यक्रम चिंचवडगाव येथील श्रावक संघाच्या सहकार्याने परमपूज्य पुष्पचूलाजी म सा, परमपूज्य सुप्रियादर्शनाजी म सा, परमपूज्य नियमदर्शनाजी म सा आणि परमपूज्य विनीतयशाश्रीजी म सा आदी साध्वीजींच्या मंगलमय सानिध्यात पार पडला.
यावेळी महेंद्र शिंगी यांनी जैन एकतेवरील गीत सादर केले. परमपूज्य सुप्रियादर्शनाजी म सा यांनी पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या विविध उपक्रमांचे आणि विशेषतः सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे कौतुक केले.
त्या म्हणाल्या की, सर्व संप्रदायातील संत आणि साध्वीजींना एकाच मंचावर आणून श्रावक-श्राविकांचा सामूहिक क्षमापना कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केला जात आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. जैन धर्मामध्ये क्षमापना पर्वाला मोठे महत्त्व आहे. आपले ज्यांच्याशी काही कारणामुळे मतभेद किंवा वैर निर्माण झाले आहे, बोलणे बंद झाले आहे, अशा व्यक्तींची क्षमा मागून पुन्हा स्नेहाचे आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे हा क्षमापना पर्वाचा उद्देश आहे. या दिवशी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता असून, महासंघाच्या या उपक्रमामुळे जैन एकता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होत आहे.
परमपूज्य नियमदर्शनाजी म सा यांनी जैन एकतेचे स्तवन सादर करून कार्यक्रमात मंगलमय वातावरण निर्माण केले. त्या म्हणाल्या, “प्रथम आपण जैन आहोत आणि त्यानंतर व्यवस्थेनुसार संप्रदायांमध्ये आहोत. त्यामुळे जैन समाजामध्ये एकी प्रस्थापित करण्यासाठी अशा कार्यक्रमांची निश्चितपणे आवश्यकता आहे.” जैन महासंघाच्या सर्व उपक्रमांसोबतच सामूहिक क्षमापनाचा उपक्रमही निश्चितपणे स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदकुमार लूनावत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शहर अभियंता पदावर पदोन्नती झाल्याबद्दल मनोज शेठीया यांचा श्रावक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. जैन महासंघाच्या वतीने अध्यक्ष श्रेयस पगारिया आणि सर्व पदाधिकाऱ्यांनीही मनोज शेठीया यांचा सत्कार केला.
जैन श्रावक संघाचे मयूर शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जैन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी समोर उभे राहून क्षमायाचना संदेशाचे वाचन केले आणि सर्वांची क्षमा मागितली. उपस्थितांनीही एकमेकांची क्षमा मागत या कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्व संप्रदायातील जैन श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, निवर्तमान अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, मंत्री वीरेश छाजेड आणि सहकोषाध्यक्ष तुषार मुथा यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, माजी अध्यक्ष नितीन बेदमुथा, विलास पगारिया, प्रकाश कटारिया, सूर्यकांत मुथियान, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया, राजेंद्र कर्नावट, प्रा. सुरेश धाडीवाल, रमणलाल शिंगवी, प्रकाश बंब, जितो अध्यक्ष संतोष चंगेडिया, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष मयूर पगारिया, अनुप नहार, रवींद्र बलाई, राजेंद्र मुनोत, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य हर्षद लुंकड, स्नेहल भंडारी, शुभम कटारिया, विकास नवले, सचिन कोगनाळे, अमोल शिरगावे, अभिनंदन छाजेड तसेच चिंचवडगाव येथील जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष अशोकजी बागमार, राजेंद्रजी जैन, राजेंद्रजी मुथा, नाशिक येथील जे. सी. भंडारी, प्रा. सुरेखा कटारिया, सौ. लता पगारिया, कविता शेठिया, लिना कटारिया, श्रुती पगारिया, अनिता नहार यांच्यासह विविध जैन संघांचे अध्यक्ष, जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















