न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ ऑक्टोंबर २०२६) :- महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव येथील एकता एज्युकेशन सोसायटी संचालित फन फॉर किड्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये आज सामाजिक संदेश देणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
शाळेसमोर जमलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात रंगीबेरंगी फलक आणि दोन्ही महापुरुषांची छायाचित्रे होती. “सत्य आणि अहिंसा – हाच गांधीजींचा मार्ग”, “स्वच्छता हीच सेवा”, “जय जवान, जय किसान” अशा घोषवाक्यांनी परिसराचे लक्ष वेधून घेतले. लहान वयातच मुलांना महापुरुषांच्या विचारांची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका शितल पावडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. शेवटी “महात्मा गांधी अमर रहे”, “लाल बहादूर शास्त्री अमर रहे” अशा घोषणा देऊन महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.


















