- सामान्य नागरिकांना मोफत पार्किंग देण्याची ऋषिकेश कानवटे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ ऑक्टोंबर २०२६) :- पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर-बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयात प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून ‘पे अँड पार्क’च्या माध्यमातून शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी युवा आघाडीचे ऋषिकेश कानवटे यांनी केला आहे. नागरिकांची ही आर्थिक लूट तात्काळ थांबवून मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिका कार्यालयात नागरिकांना त्यांच्या तक्रारी, दाखले आणि विविध प्रशासकीय कामांसाठी वारंवार यावे लागते. अशा नागरिकांकडून पार्किंग शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे कानवटे यांनी म्हटले आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत पार्किंगची सुविधा मिळत असताना नागरिकांकडून शुल्क का आकारले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नागरिकांना पार्किंग शुल्कातून सूट देऊन ‘पे अँड पार्क’ धोरणात बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास औंध क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कानवटे यांनी दिला.


















