- मोशीत ४ ऑक्टोबरला हजारो ढोल-ताशांचा निनाद..
- स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ आणि धर्मध्वजाला ऐतिहासिक मानवंदनेचा संकल्प..
- १११ शंखांचा शंखनाद, शिवशंभो गर्जना, शाहिरी आणि मर्दानी खेळांचा थरार; सर्वांसाठी मोफत प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ ऑक्टोंबर २०२६) :- मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता भव्य मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला तसेच निर्माणाधीन १२८ मीटर उंच धर्मध्वजाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.
आयोजकांच्या माहितीनुसार, पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी झाली असून सामूहिक वादनातून नवा विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प आहे. विक्रमाची अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर होणार आहे.
सोहळ्यात १११ शंखांचा सामूहिक शंखनाद, ‘शिवशंभो गर्जना’, शाहिरी कार्यक्रम आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके होणार आहेत. तसेच ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत सामूहिक प्रतिज्ञा आणि संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन होणार आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत प्रवेश असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


















