- आ. अमित गोरखे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ ऑक्टोंबर २०२६) :- येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात ३० सप्टेंबर रोजी पोहण्यासाठी गेलेल्या मुलांना उलट्या, मळमळ व अस्वस्थतेचा त्रास झाला. सुमारे १० मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.
गोरखे यांनी २७ जुलै रोजी याच क्रीडा संकुलातील प्रशासकीय बाबींवर तपासणीची मागणी केली होती. त्यानंतरही अशी घटना घडल्याने प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
तलावातील क्लोरीन व रसायनांचे प्रमाण, डोसिंग यंत्रणा, पाण्याची प्रयोगशाळा तपासणी, लॉगबुक, प्रशिक्षित कर्मचारी, लाइफगार्ड, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गोरखे यांनी केली.

















