- महिलेच्या त्या अघोरी कृत्याने उडाली खळबळ…
- महिलांना आवरताना पोलिसांची दमछाक…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ ऑक्टोंबर २०२६) :- खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या अटकेला विरोध करत त्याची आई आणि बहीण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही महिलांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघींनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरात इरफान याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अभिषेक लालमण यादव याच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी अभिषेक यादव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याची आई आणि बहीण पोलीस ठाण्यात आल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघींनी अटकेच्या कारवाईला विरोध करत पोलीस ठाण्याच्या आवारात आरडाओरड केली.
पोलिसांच्या तक्रारीनुसार, आरोपीच्या बहिणीने मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण केले. तसेच तिने अंगावरील टी-शर्ट काढल्याचे, तर आईने पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगला डोके आपटून स्वतःला दुखापत करून घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांच्या कामात दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
यावेळी दोन्ही महिलांनी पोलिसांशी हुज्जत घालत अपशब्दांचा वापर केल्याचे तसेच पोलिसांना धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या दोन्ही महिलांविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याचे समजते. मात्र, या पूर्वीच्या गुन्ह्यांबाबतची नेमकी माहिती आणि त्यातील सद्यस्थितीची स्वतंत्र अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.
घटनेदरम्यान पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांना दोन्ही महिलांना आवरण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. महिलांकडून कथितरीत्या अश्लील/असभ्य भाषा वापरणे, मोबाईलवर चित्रीकरण करणे आणि गोंधळ घालणे सुरू असल्याचे उपस्थित महिला पोलिसांनी सांगितले. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या संपूर्ण प्रकारामुळे आरोपींच्या नातेवाईकांकडून पोलीस कारवाईला विरोध करण्याचा प्रकार चर्चेत आला असून, चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

















