न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ ऑक्टोंबर २०२६) :- पिंपरी परिसरातील जय मातादी सर्व्हिस सेंटरमधून ईव्ही दुचाकींच्या बॅटऱ्या आणि मोटर चोरी करून त्या भंगारवाल्याला विकल्याप्रकरणी विधीसंघर्षित बालकासह एका भंगारवाल्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार डिसेंबर २०२५ पासून १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत मोहननगर, चिंचवड येथील जय मातादी सर्व्हिस सेंटरमध्ये घडला. सर्व्हिस सेंटरमध्ये ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या विधीसंघर्षित बालकाने ईव्ही दुचाकींच्या बॅटऱ्या व ईव्ही मोटर चोरी केल्या. त्यानंतर त्याने या वस्तू चिखली येथील अंदाजे ४० वर्षीय भंगारवाल्याला विकल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ९ लाख ८६ हजार रुपये आहे. याप्रकरणी स्वाती मनीष मोहिते (वय ४६, रा. भक्ती शक्ती अपार्टमेंट, गोलांडे इस्टेट, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अतिग्रे करीत आहेत.


















