न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. ३ ऑक्टोंबर २०२६) :- निघोजे येथील एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोर रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून ११ हजार ४७० रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.
अजय चिंतामन देसलेपाटील (वय २९) हे २८ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरून जात होते. त्यावेळी अनोळखी रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच दमदाटी करून त्यांच्या पॅन्ट व शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. कोणताही ठोस सुगावा नसताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून रिक्षाचा क्रमांक मिळवून पोलिसांनी आरोपींपर्यंत मजल मारली.
तपासादरम्यान अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. तसेच एका विधी संघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख हा निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातून १५ दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी शेखर माने याच्याविरुद्धही जबरी चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करीत आहेत.

















