- इंदिरा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट..
- स्थानिक प्रशासन, मतदानाचे महत्त्व आणि नागरिक प्रश्नांवर मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ ऑक्टोंबर २०२६) :- इंदिरा युनिव्हर्सिटी (पुणे) येथील ‘स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूनम कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना स्थानिक शासन व्यवस्था, नागरिक प्रशासन, सार्वजनिक प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीबाबत बारणे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिषेक बारणे यांनी लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे हे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, युवकांनी राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे ही देशाच्या भविष्यासाठी गरजेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मतदार याद्या अद्ययावत करणे, मृत व्यक्तींची नावे वगळणे, बोगस मतदानाला आळा घालणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरही चर्चा झाली. कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी तसेच घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या जनजागृतीबाबतही विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांची भूमिका, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविताना प्रशासनाचे महत्त्व आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी याबाबत बारणे यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी आरोग्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा संकलन, मालमत्ता कर तसेच विविध कल्याणकारी योजना अशा नागरिकांशी थेट संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतात, तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यात लोकप्रतिनिधींची भूमिका काय असते, याचा विद्यार्थ्यांना जवळून अनुभव घेता आला.
विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवादातून युवकांचा राजकारण आणि प्रशासनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. भावी पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना लोकशाही, प्रशासन आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन करता आल्याचा आनंद असल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.

















