- अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा महापालिकेतर्फे सन्मान..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ ऑक्टोंबर २०२६) :- ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ ज्या मराठी भाषेत लिहिले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे ज्या भाषेत होऊन गेले, त्या मराठीला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरज नाही; ती मुळातच अभिजात आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या उद्घाटनप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन झाले.
हृदयनाथ मंगेशकर यांनी अभिजात मराठीतील काव्याला स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. बालपणी आईकडून ऐकलेल्या गोष्टी आणि वाचनातून भाषेचे सौंदर्य मनावर संस्कार करत गेले, असे त्यांनी नमूद केले. आपल्या संगीतसाधनेत लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पत्नी भारती मंगेशकर, पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, किरण गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. छायाचित्र प्रदर्शन ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात सुरू राहणार आहे.


















