न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी सांगवी (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दरमहा १० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गृहिणीची तब्बल २१ लाख ३७ हजार ४४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील साई राज रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेची आरोपींनी शेअर मार्केट व फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. दरमहा १० टक्के चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला वेळोवेळी थोड्या प्रमाणात नफा परत देण्यात आला. त्यामुळे फिर्यादीचा आरोपींवर विश्वास बसला.
त्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात एकूण २१,३७,०४४ रुपये गुंतवले. मात्र, त्यानंतर आरोपींनी नफा देणे बंद केले. तसेच ट्रेडिंगसाठी गुंतवलेली मूळ रक्कमही परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी बाजीराव विलास पाटील (वय ४८), ४४ वर्षीय महिला आणि सर्वेष बाजीराव पाटील (वय १८) यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

















