- पिंपरी-चिंचवडचा विश्वविक्रम..
- ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ४ हजार ११२ ढोल-ताशांच्या वादनातून ऐतिहासिक मानवंदना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ ऑक्टोंबर २०२६) :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ४ हजार ११२ ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक मानवंदना देत पिंपरी-चिंचवडमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला.
मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर, चऱ्होली या तीन ठिकाणी एकाचवेळी पाच मिनिटांचे शिस्तबद्ध सामूहिक ढोल-ताशा वादन करण्यात आले. यापूर्वी २ हजार ६५० ढोल-ताशांच्या वादनाचा विक्रम होता. तो मोडून ४ हजार ११२ वादकांच्या सहभागातून नवा विक्रम नोंदविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सोहळ्यात १११ शंखांचा सामूहिक शंखनाद, ‘शिवशंभो गर्जना’, मर्दानी खेळ, शाहिरी सादरीकरण आणि सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन झाले. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. तसेच नशामुक्त भारताची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.


















