- हसता हसता नात्यांचा आरसा दाखवणाऱ्या नाटकाला रामकृष्ण मोरे सभागृहात रसिकांची भरभरून दाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ ऑक्टोंबर २०२६) :- अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे ‘नियम आणि अटी’ या नाटकाचा प्रयोग उत्साहात झाला. संसारातील रुसवे-फुगवे, अपेक्षा, गैरसमज आणि प्रेमाच्या हळव्या क्षणांना विनोदाची किनार देणाऱ्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
लेखक व अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते प्रशांत दामले यांच्या या नाटकातून पती-पत्नीच्या नात्यातील गुंतागुंत प्रभावीपणे मांडण्यात आली. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच नात्यांकडे आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त केले.
यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते संकर्षण कऱ्हाडे यांचा सन्मान करण्यात आला. अभिजात मराठी भाषा सप्ताहासारख्या उपक्रमांतून मराठी भाषा, साहित्य आणि रंगभूमी नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संवाद आणि समजूतदारपणातून नात्यांमधील अनेक गाठी सुटू शकतात, हा संदेश नाटकाने दिला.


















