- सोन्याचे मंगळसूत्र तपासण्याचा बहाणा..
- चाकण-शिक्रापूर रोडवरील घटनेने खळबळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ ऑक्टोंबर २०२६) :- सोनार असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन करत तिच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन दोन अनोळखी व्यक्तींनी पोबारा केल्याची घटना मोहितेवाडी, ता. खेड येथे घडली. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ७.१५ वाजण्याच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवरील गुरुमाऊली पेट्रोल पंपासमोरील ‘नाथ कृपा टी स्टॉल’ येथे घडली. २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून तेथे आले होते. त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते.
दोघांनी फिर्यादी महिलेला आपण सोनार असल्याचे सांगून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खरे आहे की बनावट, हे तपासण्याचा बहाणा केला. त्यानंतर मंगळसूत्र हातात घेऊन ते परत न करता दोघेही तेथून निघून गेले. मंगळसूत्रात सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, काळे मणी व दोन सोन्याच्या वाट्या होत्या. त्याची किंमत अंदाजे ४० हजार रुपये आहे.
याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात BNS कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे व सहायक पोलीस निरीक्षक दगडे करीत आहेत.

















