- उमेदवारांची नावे स्पष्ट, महायुतीतच संघर्षाची शक्यता..
- पदवीधरमध्ये भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यासमोर हर्षदा देशमुख-जाधव यांच आव्हान?..
- शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे रिंगणात उतरण्याच्या तयारीत?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे | ५ ऑक्टोबर २०२६ :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे. भाजपने दोन्ही मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पदवीधरसाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना तर, शिक्षकसाठी कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिक्षक मतदारसंघासाठी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांची अधिकृत घोषणा आणि उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अंतिम स्थिती स्पष्ट होणार आहे.
भाजप – डॉ. स्मिता योगेश जाधव…
भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. डॉ. जाधव या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाने त्याच दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्या ५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – हर्षदा देशमुख-जाधव..
महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळण्याची शक्यता असून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव पुढे आले आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या असलेल्या हर्षदा देशमुख-जाधव या शिक्षण, सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित कामासाठी परिचित आहेत. त्यांच्या नावाची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)..
महायुतीमध्ये पुणे पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडूनही दावा करण्यात आला होता. सुनील टिंगरे आणि भैय्या माने ही नावे इच्छुक म्हणून चर्चेत होती. मात्र भाजपने डॉ. स्मिता जाधव यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उमेदवारीबाबतचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुणे शिक्षक मतदारसंघात तिरंगी/चौरंगी लढतीची शक्यता…
भाजप – कौस्तुभ गावडे…
भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. गावडे हे कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा संस्थात्मक अनुभव लक्षात घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस – जयंत आसगावकर…
काँग्रेसने पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. २०२० च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही काँग्रेसकडून त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
शिवसेना (शिंदे गट) – मंगेश चिवटे..
भाजपला पुणे शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यानंतरही मंगेश चिवटे यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ६ ऑक्टोबर रोजी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही चिवटे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन घटक पक्षांचे उमेदवार एकाच मतदारसंघात येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेशी संबंधित अपक्ष – प्रा. सचिन सानप…
शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर प्रा. सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. शिक्षकांचे प्रतिनिधित्व शिक्षकानेच करावे, या भूमिकेतून ते निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची संख्या आणखी वाढू शकते.
मतदारसंघाचा विस्तार आणि मतदारसंख्या…
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात. अंतिम मतदार यादीच्या माहितीनुसार पुणे विभागात ३ लाख १० हजार ९६४ पदवीधर आणि ५१ हजार ९७९ शिक्षक मतदार आहेत.
पदवीधर मतदारसंघातील जिल्हानिहाय मतदारसंख्या अशी आहे…
पुणे – ६१,११३
सोलापूर – ३८,०२२
सातारा – ४२,०६३
सांगली – ७८,३६६
कोल्हापूर – ९१,४००
शिक्षक मतदारसंघात…
पुणे – १२,१८७
सोलापूर – १३,१५८
सातारा – ९,०९७
सांगली – ७,३२२
कोल्हापूर – १०,२१५
२३ ऑक्टोबरला मतदान…
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
२०२० च्या निकालाची पार्श्वभूमी…
गत २०२० च्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड विजयी झाले होते, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर विजयी झाले होते. यंदा दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची समीकरणे बदलली आहेत.


















