- खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- नेहरुनगर परिसरात ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटची चौकोनी फरशी मारून त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाकर कुंडलीक सरकटे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.
ही घटना रविवारी (४ ऑक्टोबर) पहाटे साडेएकच्या सुमारास संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यान, नेहरुनगर, पिंपरी येथील फुटपाथवर घडली. अज्ञात कारणातून आरोपीने प्रभाकर सरकटे यांच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी फरशीने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताच्या मुलाने गणेश प्रभाकर सरकटे (वय २४, रा. नेहरुनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी रोहित ऊर्फ भाऊ जांग्या प्रकाश धोत्रे, अर्णव ऊर्फ अरव लोकेश ऊर्फ आरव्या, प्रणित प्रशांत निकाळजे (वय १९) आणि सचिन राम साबळे (वय २९) यांची नावे आरोपी म्हणून नोंदवली आहेत. त्यापैकी रोहित, प्रणित आणि सचिन यांना अटक करण्यात आली असून, अर्णवचा शोध सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण काय, तसेच आरोपींचा खुनात नेमका सहभाग कसा आहे, याचा तपास संत तुकाराम नगर पोलिस करत आहेत.

















