- पालिकेच्या निर्णयाने उडाली खळबळ!..
- ”आर्चरी प्रशिक्षण केंद्र” असलेल्या जागेवर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा घाट…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- चिंचवडमधील आरक्षण क्रमांक २२१ च्या जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून घनकचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हे आरक्षण यापूर्वीच क्रीडाविषयक वापरासाठी विकसित करण्यात आले आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून येथे भव्य धनुर्विद्या (आर्चरी) प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून खेळाडू या मैदानावर नियमित सराव करत असून, येथून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही घडत आहेत. त्यामुळे याच जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास क्रीडा सुविधेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या जागेच्या परिसरात ऐतिहासिक मोरया गोसावी गणपती मंदिर (वाडा), धनेश्वर मंदिर, पालिका जलतरण तलाव, पुनरुत्थान गुरुकुलम, क्रांतीवीर चापेकर शाळा आणि नागरिकांचे उद्यान आहे. त्यामुळे धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा आणि नागरी वापराच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरात कचरा प्रकल्प प्रस्तावित करण्यामागील पालिकेची भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.


















