- आर्किटेक्ट-अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा..
- मंजुरी, ना-हरकत आणि विलंबाच्या तक्रारी कायम..
- सिंगल विंडो प्रणालीसह कालमर्यादेची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील कामकाजाबाबत आर्किटेक्ट आणि लायसन्स इंजिनिअर्सनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. विविध परवानग्या, ना-हरकत दाखले आणि मंजुरी प्रक्रियेत विलंब होत असल्याचा दावा करत संबंधित संघटनेने महापालिका आयुक्तांकडे प्रशासकीय सुधारणांची मागणी केली आहे.
क्रिएटिव्ह फोरम-आर्किटेक्ट आणि लायसन्स इंजिनिअर्स संघाचे अध्यक्ष राहुल काळभोर, सचिव हृषीकेश देवरे यांच्यासह आर्किटेक्ट व अभियंत्यांनी याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. बांधकाम परवानगीशी संबंधित नगररचना, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, उद्यान आणि अग्निशमन विभागांच्या प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विविध विभागांचे अभिप्राय आणि ना-हरकत दाखले एकाच ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध करून देत सिंगल विंडो पद्धत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अर्ज दाखल झाल्यापासून प्रत्येक टप्प्याची तारीख, संबंधित अधिकारी आणि प्रकरणाची स्थिती ऑनलाइन दिसावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
यापूर्वीही चार वेळा निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सात दिवसांत बैठक न घेतल्यास लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


















