- रक्तदान, आरोग्य शिबिर, नशामुक्ती प्रतिज्ञा व गोसेवा जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना देण्यासाठी आयोजित सोहळ्यात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. भाजपच्या माध्यमातून नशामुक्त भारताची सामूहिक प्रतिज्ञा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, गोसेवा जनजागृती आणि भारतमातेच्या रांगोळीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिक व शिव-शंभूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवारी (दि. ४) झालेल्या या सोहळ्यात हजारो वादक व नागरिक सहभागी झाले. युवा पिढी व्यसनमुक्त राहावी, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढावी आणि समाजसेवेची भावना बळकट व्हावी, या उद्देशाने उपक्रम घेण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन, १११ शंखांचा सामूहिक शंखनाद आणि ढोल-ताशांच्या गजरातून मानवंदना देण्यात आली.
या उपक्रमांच्या यशस्वितेसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, डॉक्टर, रक्तदाते, कलाकार आणि नागरिकांनी सहकार्य केले, अशी माहिती सरचिटणीस विकास डोळस व संजय पटनी यांनी दिली.


















