- ‘मराठी भाषेचा प्रवास’ परिसंवादात भाषातज्ज्ञ, साहित्यिक व मान्यवरांचे विचार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्रदीर्घ भाषिक परंपरेचा गौरव आहे. मात्र हा गौरव केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता मराठीचा घर, शाळा, प्रशासन, ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावी वापर वाढविणे आवश्यक आहे, असा सूर ‘मराठी भाषेचा प्रवास’ या परिसंवादातून उमटला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आचार्य अत्रे रंगमंच येथे परिसंवाद झाला. प्रकाश निर्मळ, कैलास भैरट, प्रा. कल्पना क्षीरसागर, प्रदीप कदम आणि श्रीकांत चौगुले यांनी मराठीच्या प्रवासावर विविध पैलूंवर विचार मांडले. अध्यक्षस्थानी श्रीकांत चौगुले होते.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या साहित्यापासून नाणेघाटातील प्रस्तरलेख, लोकपरंपरा आणि आधुनिक साहित्यापर्यंत मराठीचा समृद्ध प्रवास वक्त्यांनी उलगडला. मालवणी, वऱ्हाडी यांसह विविध बोलीभाषांनी मराठीची शब्दसंपदा समृद्ध केली असल्याचे सांगण्यात आले. बदलत्या डिजिटल माध्यमांचा वापर करून तरुण पिढीपर्यंत मराठी प्रभावीपणे पोहोचविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

















