- आमदार जगताप कुटुंबीयांसह आ. बनसोडेंच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह?..
- मा. आ. गौतम चाबुकस्वारांकडून ‘मशीन घोटाळ्या’चा आरोप..
- मताधिक्क्याबाबत उपस्थित केला सवाल…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, त्यांच्या पत्नी माजी आमदार अश्विनीताई जगताप आणि बंधू विद्यमान आमदार शंकरशेठ जगताप यांच्याबाबत बोलताना “हे सर्वजण निवडणुकीच्या मशीनमध्ये घोटाळा करूनच निवडून आले आहेत,” असं आक्षेपाहार्य विधान केलं आहे. त्याचबरोबर पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विजयावर देखील संशय व्यक्त केला आहे.
लोकशाही आणि संविधानाच्या सुरक्षेसह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. ८) ‘लोकशाही बचाव मार्च’ काढण्यात येणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. चाबुकस्वार बोलत होते. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत इंडिया आघाडीच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेत बोलताना चाबुकस्वार म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून भाजपचे स्व. आ. लक्ष्मणभाऊ जगताप सुमारे ३८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना सुमारे ३६ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला. या निकालांचा संदर्भ देत चाबुकस्वार यांनी “हे सर्व मशीनमध्ये घोटाळा करूनच निवडून आले आहेत,” असा गंभीर आरोप केला. तसेच पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरही त्यांनी आरोप करत, “ते देखील यात मागे नाहीत,” असा दावा केला.
दरम्यान, चाबुकस्वार यांनी केलेल्या या आरोपांबाबत संबंधित जगताप कुटुंबीय तसेच आमदार अण्णा बनसोडे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांवर त्यांची भूमिका काय आहे? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


















