- उपनेत्या सुषमा अंधारे यांचे शिवसैनिकांना आवाहन..
- पुणे पदवीधर निवडणूक स्वाभिमानाने लढण्याचा निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :- “महाविकास आघाडीच्या संभ्रमात राहू नका ! ही निवडणूक अत्यंत स्वाभिमानाने लढायची आहे. उद्धव ठाकरे यांनी सुनील मोदी यांना उमेदवारी दिली आहे. आता प्रत्येक शिवसैनिकाने इमाने-इतबारे कामाला लागावे,” अशा शब्दांत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (दि. १४) शिवसैनिकांना निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज रहाण्याचे आवाहन केले.
पुणे पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनील जबरचंद मोदी यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांचा मेळावा पिंपरीतील एका हॉटेलमध्ये पार पडला. या मेळाव्यात अंधारे यांनी आपल्या आक्रमक शैलीत कार्यकर्त्यांना निवडणुकीचे महत्त्व पटवून देत पक्षाच्या उमेदवारासाठी एकजुटीने मैदानात उतरण्याचे आवाहन केले. यावेळी शहरप्रमुख चेतन पवार, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उमेदवार सुनील जबरचंद मोदी, रोमी संधू, प्रवक्ते रावसाहेब थोरात यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिक दुर्बल नाही, प्रामाणिक
शिवसैनिकांच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास व्यक्त करताना अंधारे म्हणाल्या, “शिवसैनिक दुर्बल नाही, तर प्रामाणिक आहे. तळागाळात त्याचा संपर्क आहे. प्रत्येक माणूस शिवसैनिकांशी जोडलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली ताकद ओळखून या निवडणुकीत काम केले पाहिजे.” केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुरते राजकीय काम मर्यादित न ठेवता बाजार समित्या, पंचायत समित्या आणि सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्येही आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. या निवडणुकीत मतदार प्रक्रिया किचकट असली, तरी संघटनात्मक नियोजन आणि मतदारांशी थेट संपर्कातून निवडणुकीत प्रभावी काम करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे प्रश्न सभागृहात पोहोचवायचे आहेत
विद्यार्थ्यांचे प्रश्न केवळ रस्त्यावरच्या आंदोलनांपुरते मर्यादित न राहता ते सभागृहातही प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत. पुणे विद्यापीठातील शिष्यवृत्ती, वसतिगृहांच्या समस्या आणि पदभरतीसह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेनेने लढा दिला आहे. माझा लढा सभागृहाबाहेर सुरू आहे; पण हा लढा सभागृहातही मांडला गेला पाहिजे. त्यासाठी आपला उमेदवार सभागृहात पाठवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यांचा आवाज बनणारा प्रतिनिधी निवडून येणे महत्त्वाचे आहे, असे उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचाराला बळ द्यावे, असे आवाहन अंधारे यांनी केले.
तरुणाईने सत्तेचा माज पायदळी तुडवला
देशातील तरुण पिढीच्या असंतोषाचा उल्लेख करत अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मोठे नेते मोदी-शहांच्या विरोधात बोलण्यास घाबरत असताना तरुणांनी सत्तेचा माज पायदळी तुडवला. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणातील अडचणी आणि तरुणांच्या अपेक्षा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याची गरज आहे, अशी भावना अंधारे यांनी व्यक्त केली.
बॅलेट पेपरवरील निवडणुकीचा अनुभव लक्षात ठेवा
मुंबईतील विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले आणि पक्षाला यश मिळाले, याची आठवण करून देत अंधारे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचाही उल्लेख केला. जिथे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, तिथे पक्षाने यश मिळवल्याचे त्या म्हणाल्या. निवडणुकीत विजयासाठी केवळ उत्साह पुरेसा नसून नियोजन, सातत्य आणि संघटित प्रयत्न आवश्यक असते. कोणतेही युद्ध आधी मनाने जिंकले जाते आणि त्यानंतर रणांगणात लढले जाते. त्याचप्रमाणे राजकीय कारकीर्द सिद्ध करण्यासाठी नियोजन आणि मेहनत आवश्यक आहे. सुनील मोदी यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने शिवसैनिकांनी पक्षनिष्ठा, संघटनशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्नांची ताकद दाखवून द्यावी. पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रचारात सक्रिय व्हावे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले.
मी निवडून येणार म्हणजे येणारच, त्यासाठीच उमेदवार म्हणून मैदानात उतरलो आहे ! विजय मिळवल्यानंतर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत शिवसैनिकांची मान अभिमानाने ताठ राहील, असे काम करून दाखवेन. हा केवळ शब्द नाही, तर तमाम शिवसैनिकांना आणि मातोश्रीला दिलेला माझा ठाम शब्द आहे ! — सुनील मोदी उमेदवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पुणे पदवीधर मतदारसंघात सुनील मोदी यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने एकजुटीने कामाला लागावे. पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचे विचार प्रभावीपणे मांडावेत. पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांची संघटनशक्ती आणि मेहनत या निवडणुकीतून निश्चितच दिसून येईल. प्रत्येक कार्यकर्ता आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल, याची मला खात्री आहे. सुनील मोदी यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू. — चेतन पवार, शहरप्रमुख-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पिंपरी-चिंचवड…

















