न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :- थकीत पगार मागितल्याच्या रागातून एका सुपरवायजरच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रावेत येथे घडली. तसेच दुसऱ्या व्यक्तीला हाताने आणि बेल्टने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास यशदा सोसायटीसमोरील शांताई कॉर्नर चौकात घडली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर विश्वास पाटील (वय ३८) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन पवार आणि परशुराम वारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दोन ते तीन वेळा पगार मागितला होता. तसेच आपण कामावर येणार नसल्याचे सांगितल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादीला दमदाटी केली. ‘तू कामावर आला नाहीस, तर तू जगातही राहणार नाहीस,’ अशी धमकी देत आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या गळ्यावर धारदार लोखंडी कोयत्याने वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
दरम्यान, आरोपी क्रमांक दोन याने निलेश मगन गर्दे (पाटील) यांना हाताने आणि बेल्टने पोटावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.
















![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)

