- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या FRO विभागाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :-
भारतात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही कोणतीही मुदतवाढ न घेता अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या युगांडा देशातील तीन महिलांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुंजी येथील हॅपी होम्स परिसरात १३ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तिन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर भारतातून मायदेशी पाठविण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा, विशेषतः आफ्रिकन देशांतील नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, विशेष शाखा-२ मधील परकीय नागरिक नोंदणी विभागाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती संकलित केली होती.
मारुंजी परिसरातील सर्व्हे क्रमांक ७/४, शॉप क्रमांक ०३, गेट क्रमांक ०५, हॅपी होम्स येथे व्हिसाची मुदत संपलेले काही परदेशी नागरिक राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या आदेशाने FRO विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पडताळणी केली. यावेळी युगांडा देशाच्या तीन महिला आढळून आल्या. त्यांची नावे डोरेक अहैसबिवे (DORECK AHAISBIWE), प्रॉसी अंकुंडा (PROSSY ANKUNDA) आणि अमिना कतुसीमे (AMINA KATUSIIME) अशी आहेत.
पोलिसांनी महिलांकडे पासपोर्ट आणि व्हिसाच्या मूळ प्रती मागितल्या असता त्यांनी छायांकित प्रती सादर केल्या. त्यानंतर IVFRT प्रणालीवर उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत तिन्ही महिलांकडे युगांडा देशाचे पासपोर्ट आणि व्हिसा असल्याचे समोर आले.
डोरेक अहैसबिवे हिच्याकडे विद्यार्थी व्हिसा होता. तिच्या व्हिसाची मुदत ७ ऑक्टोबर २०२६ रोजी संपली होती. प्रॉसी अंकुंडा हिचा वैद्यकीय व्हिसा २९ डिसेंबर २०२५ रोजी, तर अमिना कतुसीमे हिचा वैद्यकीय व्हिसा ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संपला होता. मात्र, तिन्ही महिलांनी व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात राहण्यासाठी कोणतीही मुदतवाढ घेतली नसल्याचे पोलिसांच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यामुळे या महिला व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या FRO विभागामार्फत त्यांना भारतातून मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या खोलीत, बंगल्यात, फ्लॅटमध्ये किंवा हॉटेलमध्ये परदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास संबंधितांनी २४ तासांच्या आत सी-फॉर्म भरून परकीय नागरिक नोंदणी विभागाकडे (FRO) माहिती देणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत माहिती न दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
तसेच, आपल्या परिसरात कोणताही परदेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या FRO विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अहमद शेख आणि पोलीस अंमलदार सुनीता खोमणे, अक्षय घोडमारे, पाटील, घुले व यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.


















