- सीआयडी आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दोघांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. पिंपळे सौदागर आणि मोशी परिसरात दोन ज्येष्ठ नागरिकांना सीआयडी व पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी सांगवी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपळे सौदागरमध्ये सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी
पहिली घटना १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात, बेल्जियम वॉफल दुकानासमोर घडली. नारायण ओंकार कासार (वय ७५, रा.पिंपळे सौदागर) हे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यापैकी एकाने आपण सीआयडी अधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर या दोघांनी कासार यांना गळ्यातील सोन्याची रुद्राक्षाची माळ आणि हातातील सोन्याची अंगठी काढून कपड्यात ठेवण्यास सांगितले. याचदरम्यान हातचलाखी करून आरोपींनी त्यांचे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची रुद्राक्षाची माळ असा एकूण २ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोशीत पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठाला लुटले
दुसरी घटना मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात श्री रविशंकर विद्यालयापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या निर्जन रस्त्यावर घडली. बबन भाऊसाहेब बोऱ्हाडे (वय ७७, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) हे १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले.
आरोपींनी आपण पोलीस असल्याचे सांगत दूरून ओळखपत्र दाखवले. त्यानंतर तेथून जाणाऱ्या अन्य एका व्यक्तीला थांबवून त्याच्याकडील अंगठी आणि चैन रुमालात ठेवण्यास सांगितले. हा प्रकार पाहिल्यानंतर आरोपींनी बोऱ्हाडे यांनाही त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची चैन रुमालात ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर दागिन्यांवरील नंबर तपासायचा असल्याचे सांगून आरोपींनी रुमालातील दागिने हातात घेतले आणि दुचाकीवरून पळ काढला. या घटनेत बोऱ्हाडे यांची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी पोलीस किंवा सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अनओळखी व्यक्ती पोलीस असल्याचे सांगत दागिने काढण्यास सांगत असल्यास सावध राहावे. ओळखपत्राची खात्री केल्याशिवाय कोणाच्याही सांगण्यावरून अंगावरील दागिने काढून देऊ नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

















