- टेलिकॉम विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक; ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात अडकवण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. १५ ऑक्टोबर २०२६) :- टेलिकॉम विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची तसेच अटक करण्याची भीती दाखवत सायबर चोरट्यांनी बावधन येथील एका ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल १ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. २० ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील पाटीलनगर परिसरात राहणाऱ्या या ज्येष्ठ महिला निवृत्त असून, आरोपींनी त्यांना फोन करून फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. पहिल्या आरोपीने आपण नवी दिल्ली येथील टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. महिलेच्या नावावर असलेल्या सिमकार्डवरून आक्षेपार्ह मजकूर आणि अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या आरोपीने व्हॉट्सॲप कॉल करून आपण क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवले. महिलेच्या कॅनरा बँकेतील खात्याशी संबंधित विविध ठिकाणांहून सुमारे २५ तक्रारी आल्याचे सांगत, त्यांच्या बँक खात्यात संशयास्पद पैसे जमा झाले असून, त्यांचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला. या प्रकरणात अटक होणार असल्याची भीतीही दाखवली.
आरोपींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत तसेच सुप्रीम कोर्टाचा शिक्का असल्याचे नमूद केलेले अटक वॉरंट आणि इतर कागदपत्रे व्हॉट्सॲप कॉलवर दाखवून महिलेवर मानसिक दबाव निर्माण केला. त्यानंतर तिच्या बँक खात्यांची, मुदत ठेवींची (एफडी) आणि इतर गुंतवणुकींची माहिती घेतली.
महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी तिच्या खात्यातील रक्कम पडताळणीच्या नावाखाली त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगितले. या रकमेची पडताळणी झाल्यानंतर ती परत मिळेल, असे भासवण्यात आले. तसेच, जमा झालेल्या रकमेबाबत आरबीआयच्या लेटरहेडवर सही आणि शिक्का असलेली पावतीही दाखवण्यात आली.
मात्र, पैसे हस्तांतरित केल्यानंतर आरोपींनी ही रक्कम महिलेला परत केली नाही. अशा प्रकारे आरोपींनी तिची एकूण १ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.


















