- १५ नोव्हेंबरला आळंदीत रिक्षा-टॅक्सी चालकांची संयुक्त बैठक!
- ॲप कंपन्यांच्या मनमानीविरोधात आंदोलनाची दिशा ठरणार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आळंदी देवाची येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत राज्यव्यापी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी माहिती दिली.
अनधिकृत बाईक टॅक्सी, ऑनलाइन ॲप कंपन्यांची मनमानी आणि चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची प्रलंबित अंमलबजावणी हे बैठकीतील प्रमुख विषय असणार आहेत. तसेच परवाना नूतनीकरण, फिटनेस पासिंगमधील कथित भ्रष्टाचार, पार्किंग स्टँड आणि कामगारांचे हक्क यावर चर्चा होणार आहे.
राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, राज्यव्यापी महामोर्चा आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
डॉ. बाबा कांबळे यांनी राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

















