- स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात शहर अव्वल, पण कचरा व्यवस्थापनावर नोटिसांचा भडिमार!..
- पर्यावरणप्रेमी डॉ. विजयकुमार पाटील यांचा महापालिका प्रशासनावर निशाणा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असतानाच शहरातील कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांत मोशी कचरा डेपो, नदी प्रदूषण आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांमधील कथित नियमभंगाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) महापालिकेला नोटिसा बजावल्याचा दावा करण्यात आला आहे.
मोशी कचरा डेपोतील मिथेन उत्सर्जन, बायोमायनिंगमधील दिरंगाई, वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील राखेची विल्हेवाट तसेच पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाचे मुद्दे चर्चेत आले आहेत. नियमभंगप्रकरणी दोन लाख रुपयांची बँक हमी जमा करण्याचे आदेशही MPCBने दिल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पर्यावरणप्रेमी डॉ. विजयकुमार पाटील यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. पुरस्कार मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शहरातील अनेक भागांत ओला-सुका कचरा वर्गीकरण, मोशी डेपोतील कचऱ्याचे ढिगारे आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या कायम असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील यश आणि प्रत्यक्ष स्वच्छतेची परिस्थिती यामध्ये तफावत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुरस्कारांच्या गौरवाबरोबरच कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून पिंपरी-चिंचवडला प्रत्यक्षात स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

















