न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा आज मंगळवार (दि. २५) रोजी पिंपरी चिंचवड शहरात नियोजित दौरा होता. या दौऱ्यानिमित्त शहर भाजपच्या वतीने त्यांचा व नवनियुक्त राज्यमंत्री व मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा सोहळा उरकल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेट भाजपच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावली. तसेच एकटे-दुकटे न जात थेट अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना देखील भाजपच्या कार्यालयात घेऊन आयुक्त गेले होते. यादरम्यान आयुक्तांनी पालकमंत्र्यांबरोबर एक तास महत्वाच्या विषयावर चर्चाही केली.
या घटनेने महापालिकेच्या वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. एखादा आयएएस दर्जाचा प्रशासकीय अधिकारी महापालिका इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात जातो काय अन चर्चाही करतो. त्यामुळे प्रशासकीय शिष्टाचाराची आचारसंहिता मोडीत निघाली आहे. आयुक्तांच्या या बेजाबदार कृत्याने शहरभर वादंग उठले आहे. आयुक्तांच्या या वर्तवणुकीमुळे सत्ताधारी भाजपाशी थेट संधान असल्याचा विरोधी पक्षांनी मागे केलेला आरोपही तंतोतंत लागू होतो.
काय सांगतो प्रशासकीय शिष्टाचार
कोणत्याही आयएएस दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने प्रशासकीय शिष्टाचाराप्रमाणे कोणत्याही मंत्र्यांचे स्वागत पक्ष कार्यालयाच्या इमारतीच्या खाली अथवा गैरपक्षीय ठिकाणी करणे अपेक्षित असते. अन्यथा तो प्रशासकीय आचारसंहितेचा भंग ठरतो.















