न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- गहुंजे गावच्या विद्यमान सरपंच महिलेचा पतीने गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. १९) रोजी भूमकर चौक, वाकड येथे घडला. याप्रकरणी पतीच्या विरोधात रविवारी (दि. २५) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच शीतल किरण बोडके (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती किरण निर्गुण बोडके (३८, रा. भूमकर चौक, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल आणि आरोपी किरण यांचा डिसेंबर २०१६ मध्ये विवाह झाला आहे. तेव्हापासून किरण याने शीतल यांच्याकडे माहेराहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी तगादा लावला. शीतल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने किरणने त्यांचा शाररिक व मानसिक छळ केला. तसेच, परस्त्रीशी अनैतिक संबंध असून याबाबत शीतलने विचारणा केली असता त्याने चिडून जाऊन त्यांना वारंवार मारहाण केली. बुधवारी (दि. १९) रोजी रात्री किरण आणि शीतल यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. या वेळी चिडलेल्या किरणने ‘तुला मारूनच टाकतो’ असे म्हणून शीतल यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.















