न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- नोकरीला लावण्याच्या बहाण्याने महापालिकेच्या नावे बनावट आदेश तयार करुन, अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करणारा, तसेच विनापरवाना ९९२ दिवस गैरहजर राहणारा महापालिकेचा फरार कर्मचारी चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर याला सेवेतून कमी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच दिला आहे.
चंद्रशेखर नार्वेकर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या गट ‘क’ मधील पदावर कार्यरत होता. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०१५ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ मार्च २०१८ रोजी त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी सतत गैरहजर राहत असल्याची बाब निगडी पोलिसांनी महापालिका प्रशासनास निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आयुक्तांनी सेवेतून कमी करण्याचा आदेश दिला.















