न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- वाकड पोलिस ठाण्यातील टीम क्रमांक १५ आणि टीम क्रमांक १६ वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डांगे चौकातून थेरगावच्या बाजूला एका दुचाकीवर दोघेजण संशयितरीत्या जाताना दिसले. त्यावरून १५ नंबर टीमने १६ नंबर टीमला कळवले. १६ नंबर टीमने त्यांना थेरगाव येथे पकडले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेत वाकड पोलिस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात चौकशी करत असताना ताब्यात घेतलेले दोघेजण वापरत असलेली दुचाकी चोरीची असून तिचा नंबर बदलून ते वापरत असल्याचे समजले. त्यावरून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शहर परिसरात ११ दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. मौजमजेसाठी दुचाकी चोरी करायची. तिच्यातील पेट्रोल संपले असता ती दुचाकी तिथेच सोडून द्यायची आणि नंतर दुसरी दुचाकी चोरायची, असा या दोघांचा दिनक्रम होता.
राहुल अंकुश क्षीरसागर (वय १९, रा. कामशेत) आणि अक्षय दशरथ शिंदे (वय २०, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलिसांनी दोन लाख २१ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील सहा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत.











