न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आल्कन स्टायलस लँडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जगदीशप्रसाद अग्रवाल (६४), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (३४), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (२७), विवेक सुनिल अग्रवाल (२१), विपूल सुनील अग्रवाल (२१) या पाच जणांबरोबर साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या तीन भागीदार बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला. पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या तिघांसह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच पुणे दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच २४ तासांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.















