न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांतील कचरा कुंड्यातील कचरा उचलला न गेल्याने, मंगळवारी (दि. २) रोजी कचराकुंड्या भरून वाहत होत्या. शहर परिसरात अनेक ठिकाणी पावसामुळे कच-याची दुर्गंधी सुटली होती. कुंड्यांभोवती कुत्री, डुकरे व जनावरांचा वावर असल्याने अस्वच्छता सर्वत्र पसरली होती.
परिणामी, ‘कचरा’ समस्या अधिक वाढल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराचे दोन भागानुसार कचरा संकलन व वाहतुकीचे काम मोठा गाजावाजा करून, सोमवारी (दि. १) पासून सुरू करण्यात आले. त्यामुळे शहराची कचरा समस्या दूर होईल, असा दावा पालिका प्रशासनासह सत्ताधा-यांनी केला होता. मात्र, गेले दोन दिवस हे काम सुरू होऊनही संपूर्ण शहरात स्वच्छतेचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.













