न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ १३ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत महिन्याभरात निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यावरून कोणत्या प्रवर्गातील नगरसेवकास संधी मिळणार हे स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपमध्ये अनेकजण महापौर पदासाठी इच्छुक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवून भाजपचे कारभारी फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेत विराजमान झाले. महापौरपद इतर मागास वर्ग खुल्या गटासाठी (ओबीसी) राखीव आहे. भाजपचा पहिला महापौरपदाचा मान च-होलीचे तरुण नगरसेवक नितीन काळजे यांना मिळाला. ते आमदार महेश लांडगे गटाचे आहेत. त्यांनी जुलै २०१८ मध्ये पदाचा राजीनामा दिला. ते तब्बल साडेपंधरा महिने महापौरपदी विराजमान होते.
राहूल जाधव यांची ४ ऑगस्ट २०१८ ला महापौरपदी निवड झाली. अडीच वर्षांच्या कालावधीनुसार त्यांना १३ सप्टेंबरपर्यंत पदाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जाधव यांचा महापौरपदाचा एकूण कार्यकाळ सव्वातेरा महिने ठरणार आहे. जाधव हे आणखी सुमारे २ महिने पदाचा लाभ घेऊ शकतील.
राज्य शासनाच्या नगर सचिव विभागामार्फत महापालिकेच्या महापौरांचे अडीच वर्षांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाते. सध्या अडीच वर्षासाठी ओबीसीसाठी आरक्षण आहे. पुढील महिने अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत महिन्याभरात काढली जाण्याची शक्यता आहे.













