न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- संघर्षमय जीवण जगणारे बोपखेलवासिय आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळे बोपखेल येथील पूलाचे स्वप्न सत्यात अवतरले आहे, असे मत महापौर राहूल जाधव यानी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ४ बोपखेल येथे उभारण्यात येणा-या मुळा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, नगरसदस्य विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या नानी ऊर्फ हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसदस्य संजय (नाना) काटे, बाजीराव लांडे, उर्मिला काळभोर माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, दिपक पाटील, संजय पाटील, रविंद्र सुर्यवंशी, बोपखेल येंथील सामाजिक कार्यकर्ते नारायण घुले, कमलेश घुले, मंगला घुले, संतोष घुले, विष्णू गायकवाड, गुलाब घुले, राजेंद्र देवकर, नारायण काळे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
महापौर राहूल जाधव म्हणाले, बोपखेलकरांचा जिव्हाळयाचा विषय म्हणजे हा पूल. तो होण्यासाठी सर्व बोपखेलकरांनी प्रयत्न केले. सर्वांचे सहकार्य व माजी केंद्रीय सरंक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर याचे योगदान आहे. महानगरपालिकेत पूलासाठी एकमताने विषय मंजूर करुन भरीव तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले. येत्या दोन वर्षात बोपखेल ते खडकी या पूलाचे काम पूर्ण होवून नागरीकांसाठी पूल खुला होईल. त्या बाबत सर्व अधिका-यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याकडे लक्ष दयावे अशा सूचनाही यावेळी केल्या.
आमदार ॲड, गौतम चाबुकस्वार म्हणाले, पूलाचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा संपूर्ण बोपखेलकरांच्या संघर्षाचा विजय आहे. गावक-यांनी राज्य शासनावर योग्य तो दबाव टाकल्यामुळे कामास गती मिळाली. त्यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार, व खासदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे या यशात त्यांचे योगदान आहे.
नगरसेवक विकास डोळस म्हणाले, या पूलाचे श्रेय सर्व बोपखेल करांचे आहे. २४ महिन्यात पूलाचे काम होणार आहे. लवकरात लवकर पूल होण्यासाठी पाठपुरावा करु, असेही ते म्हणाले. नगरसेवक लक्ष्मण उंडे म्हणाले, बारा किलोमिटरचा वळसा घालून नागरिकांना जावे लागत होते. तो त्रास आता होणार नाही. या कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानायला पाहिजेत. नगरसेविका निर्मला गायकवाड म्हणाल्या, आज बोपखेलकरांचा आनंद सोहळा आहे. गावक-यांच्या लढयाला यश आले आहे. विदयार्थ्यांचा शाळेचा प्रश्न सुटला आहे त्यामुळे सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. नगरसेविका नानी घुले म्हणाल्या, या पूलामुळे गोरगरीबांचा व शाळेचा मोठा प्रश्न सुटणार आहे. येथील मुलांवर व महिलावर फौजदारी गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत. याबाबत आमदार व खासदार यांनी पाठपुरावा करावा, असे त्या म्हणाल्या.
बोपखेल ते खडकी या पूलाची लांबी १५३७ मीटर असून रुंदी ७.५ मीटर आहे. पूलास सुमारे ५३ कोटी ५३ लाख रुपये खर्च अपेक्षित असून जुलै २०२१ अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. बोपखेल परिसरातील नागरिकांना पुणे कडे ये – जा करणेसाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे १० ते १५ कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागत आहे. परंतू या पूलामुळे २.९ किलो. मीटर अंतरावर खडकी कॅन्टोमेंट भागातून पिंपरी चिंचवड व पुणे शहराकडे जाणे सुलभ होणार आहे. त्या मुळे नागरिकांचा वेळ व इंधनखर्च वाचणार असून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन घुले यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले यांनी केले.















