न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- हिंजवडी हे जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध नाव असून राज्यातील सर्वात मोठा आयटी हब म्हणून ओळखले जाते. हिंजवडी परिसरामध्ये कंपन्यांमध्ये ३ लाखापेक्षा जास्त अभियंते काम करतात. दोन ते अडीच लाख वाहने ये – जा करतात. शिवाजी चौकातून, भूमकर चौकातून, माणकडून व अन्य मार्गाने येणारी अशी सहा लेनवरील वाहने एकाच ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी होत आहे, याबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांना निवेदन दिले असून, करावयाच्या उपाय-योजनाही सुचविल्या आहेत. यावेळी संस्थापक अध्यक्ष सिध्दिकभाई शेख, हरिश्चंद्र तोडकर, राजश्री शिरवळकर, हमीद शेख आदी उपस्थित होते.
या वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे सकाळी २ तास संध्याकाळी २ तास असे ४ तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. वाहतुकीच्या अनास्थेमुळे या कंपन्यांना उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही गमवावे लागत आहे. हिंजवडीमध्ये प्रवास करताना दोन ते तीन लाख वाहने येत असल्याने त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणवर ध्वनी व वायुप्रदूषण झाल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वाहतूक कोंडीमुळे वाहनाच्या रंगाच्या रांगा लागलेल्या असतात. सकाळी व संध्याकाळी तास-तास गाडी चालू ठेऊन थांबल्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणवर नासाडी होते. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि पन्नास लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केले आहे. कंपन्यांचे स्थलांतर असेच सुरू राहिले, तर आयटी पार्कची अवस्था रोजगाराच्या दृष्टीने बिकट होण्याची दाट शक्यता आहे.
या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आयटी कंपन्या आणि प्रशासनच्या पुढाकारातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना द्यायला हवी. यासाठी हिंजवडीमध्ये यांच्या मोठ्या व्यवसाईक बसेस ची संख्या कमी होऊन वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होऊ शकेल. पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पीएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे रस्ते आहेत. त्या त्या विभागाने आहे त्या रस्त्यांची रुंदी वाढवावी व रस्त्याची गुणवत्ता सुधारावी. बंद पडलेल्या वाहनासाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन उपलब्ध असावी. वाहतुकीची शिस्त लागण्यासाठी नागरिकांशी सुसंवाद आणि वाहतुकीच्या नियमाचे कडेकोट पालन व्हावे व दंडाची रक्कम वाढवावी. हिंजवडीमधील रस्त्यावरील टपऱ्या, कंपन्यांसमोरील पदपथ, मोकळ्या जागेवरील हातगाड्या यांसारखी अतिक्रमणे काढण्यात यावीत. गाड्या पार्किंगसाठी ठिकठिकाणी वाहनतळ उभारणे, या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन ठिकाणाहून प्रवेश करता येऊ शकतो. भूमकर चौक आणि वाकड चौक ही दोन ठिकाणे त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. सहा वेगवेगळे मार्ग याच ठिकाणी एकत्र येतात. या भागातच प्रामुख्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्क सहा टप्प्यात उभारला जाणार असून दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांची उभारणी सुरु झाली आहे. उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण झाले तर तसेच मेट्रोचे काम सुरु झाले तर वाहतूक कोंडीची समस्या भीषण होणार आहे. त्यामुळे आतापासूनच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हिंजवडीमध्ये काम करणारे आयटीयन्स व अपना वतन संघटनेच्या मागणीचा विचार करीत आपण हिंजवडीमधील वाहतूक समस्येबाबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे या निवेदनात संघटनेने म्हटले आहे.















