न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- निगडी, प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे प्रभागात कचऱ्याची समस्या तीव्र झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत नगरसेवक अमित गावडे यांनी ‘अ’ प्रभाग अधिका-यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी नगरसेवक अमित गावडे, उपशहरप्रमुख अमोल निकम, महिला विधानसभा संघटिका सरिता साने, भाविक देशमुख आदी उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘प्रभाग क्रमांक १५ मधील निगडी, प्राधिकरण परिसरातील कचरा मागील काही दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नाही. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. प्राधिकरणात सर्वत्र कच-याचे ढीग साचले आहेत. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा उचलणा-या गाड्यांची वेळ निश्चित नसून त्या नियमित येत नाहीत.
पावसामुळे कचरा ओला झाला असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कचरा उचलण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. येत्या दोन दिवसात कच-याचा प्रश्न मार्गी लावावा, रस्त्यांची नियमितपणे सफाई करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


















