न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दळभद्री कारभारामुळे शहरात कचरा पेटला असून, त्याचे लोन महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहचत आहेत. कचराप्रश्नी महापालिकेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. महापालिका प्रशासन व सत्त्ताधारी भाजपने ठेकेदारांचे लाड पुरविले. आधीच शहरातील कचरा संकलन कामाला उशीर झालेला असतानाही, सत्ताधारी व प्रशासनाने ठेकेदारांना मुदतवाढ दिली. ते म्हणतील तसे ऐकले. पर्यायाने महापालिकेने ठेकेदारांचे लाड करीत त्यांना डोक्यावर घेतले.
त्याचा परिणाम आता शहराचा कचरा होण्यात झाला आहे. शहरातील विविध भागातून कचरा हटविण्याबाबत आयुक्तांना निवेदनावर निवेदन येत असून, याबाबतीत आयुक्तांची भूमिका संशयास्पद आहे. सर्वच प्रभागात व क्षेत्रीय कार्यालयात कचरा जागोजागी पडला असून, कचरा उचलण्याबाबत नागरिकांची ओरड होत असून नगरसेवक मेटाकुटीस आले आहेत.
राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे व पंकज भालेकर यांनी या कचरा आंदोलनाचे लोण आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या दालनापर्यंत पोहोचविले. पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कचऱ्याचे ढीग जमा करुन, त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदविला. दुसऱ्या घटनेत सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक तुषार कामठे यांनी आपल्या प्रभागातील ट्रॅक्टर भरून कचरा महापालिकेच्या मुख्यालयात टाकला व प्रशासनाचा वेगळ्याच निषेध केला. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट वेळेत न केल्यास मोठी गंभीर समस्या उद्भवू शकते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील कचरा तसाच पडून राहिल्यास पूरपरिस्थितीही निर्माण होऊ शकते.












