न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असताना, काही कचरावेचक कर्मचारी प्रामाणिक काम करीत असल्याचे प्रभाग क्र. १८ मधील रस्टन कॉलनी परिसरात पहावयास मिळत आहे. परंतु, या कचरा वेचकांच्या दिमतीला कचऱ्याची वाहने नसल्यामुळे प्रभागातील कचरा जागीच राहून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्याची स्थिती उत्पन्न झाली आहे. याबाबत शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र. १८ मधील रस्टन कॉलनी, पवनानगर या भागात कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नित्य-नियमाने स्वच्छतेची कामे चांगल्या प्रकारे होत असताना, या भागात मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने त्यांनी लावलेला पाला-पाचोळा व इतर कचरा हे कर्मचारी रस्त्याच्या कडेला लावत असतात. अतिशय नेटाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित कचरा गाड्या उपलब्ध होत नसल्याने कचऱ्याचे ढीगच्या-ढीग नाईलाजास्तव जमा होत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
या ठिकाणी कचरा उचलणाऱ्या गाड्या आपल्या अखत्यारीत असलेल्या ‘ब’ प्रभाग प्रशासनाकडून त्वरित उपलब्ध होत नसल्याने कचऱ्याचे समस्या या भागात गंभीर होत चालले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे. तसेच, तेथिल कचरावेचक कर्मचाऱ्यांना त्वरित गाड्या उपलब्ध करून देणेसंबंधी योग्य ते आदेश संबंधित खात्यास आपण द्यावेत. अन्यथा शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.












