न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मी स्व-पक्षातच राहणार असून आगामी व त्यापुढील निवडणुकाही भाजपच्याच झेंड्यावर लढवणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे, त्यामुळे विविध राजकीय सर्व्हे करणाऱ्या संस्थाना चपराक बसली आहे.
राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास लक्ष्मण जगताप इच्छुक असल्याचे सर्वेक्षण एका राजकीय सर्व्हे करणाऱ्या संस्थेकडून वर्तविण्यात आले होते. याचे खंडन करण्याकरिता आमदारांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याचा खुलासा केला असून यात सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याकरीता विरोधकांकडून असा चुकीचा प्रचार करण्यात येत असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले आहे. यापुढे कोणत्याही पक्षात न जाता भाजपासाठीच काम करणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.
या पत्रकात त्यांनी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, भाजपमध्येच राहून भाजपसाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असून या पुढच्या सर्व निवडणुका मी भाजपतर्फेच लढवणार असून भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले असून त्यांच्यामार्फतच माझ्या विरोधात प्रसिद्धीलोलुप वावड्या उठवल्या जात असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
या निमित्ताने आमदार जगताप यांचा तिसरा डोळा केव्हा, कधी व कोठे उघडणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये जागृत झाली असून हा सत्तेचा सारीपाट आमदार स्व-पक्षात राहूनच चालवणार की बातमी खरी करणार याचा उलगडा लवकरच होणार असल्याचे स्पष्ट होते.











