न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- युवक एकत्र आल्यास समाज घडतो. सामाजिक संघटनांमध्ये युवकांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत आहे. युवकांकडून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. श्रध्दा माणसाला माणूस बनविते. समर्पण, श्रध्दा आणि व्यवस्थापन या तीन बाबी युवकांनी अंगिकारल्या पाहिजेत असे प्रतिपादन अशोक पगारिया यांनी केले.
भारतात युवकांची मोठी संख्या आहे. या युवकांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या भविष्यात देशाचे हित दडले आहे. त्यासाठी सुसंस्कृत, चारित्रवान आणि कर्तृत्ववान युवक घडवून त्यांचे संघटन उभारावे. ही संघटीत युवा शक्तीच भारताला महासत्ता करेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योगपती राजेश सांकला यांनी व्यक्त केला.
निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशनचे (जेएसओ) पाचवे अखिल भारतीय जैन युवक संमेलन आयोजित केले आहे. दोन दिवसीय संमेलनाचे निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे शनिवारी (दि. ६) मनोहरलाल लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी राजेश सांकला बोलत होते.
मनोहरलाल लोढा स्वागताध्यक्षपदी होते. प्रकाश सांकला, बाळासाहेब धोका, सुनील नहार, प्रा. अशोक पगारिया, सुरेश गादीया, मोहन संचेती, सुरेश शेठीया आणि जेएसओचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा आदींसह देशभरातून आलेले जेएसओचे प्रतिनिधी व जैन बधू, भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
पवित्र चातुर्मासानिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब, प. पू. प्रफुल्लाजी म. सा., प. पू. हंसाजी म. सा., प. पू. पुनितीजी म. सा., प. पू. गरिमाजी म. सा., प. पू. महिमाजी म. सा. यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम सुरु होते. प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या संमेलनात जेएसओचे देशभरातून सातशे युवक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले आहेत. यावेळी उपस्थितांना संजय रावत (अहमदाबाद), राकेश जैन (इंदोर), कमल आचलिया (रायचूर) हे तज्ञ सेवा, शिक्षा, संघटन; एक कदम गुरु दरबार की ओर; एक कदम जैनत्व की ओर; देशप्रेम भारतीय संस्कृती; उद्योग धंद्यामध्ये प्रगती आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
राजेश सांकला म्हणाले की, आपण युवकांची क्षमता ओळखण्याची गरज आहे. आजचा युवक नाविन्याच्या शोधात आहे. त्यांच्यातली कल्पकतेला हेरुन ज्येष्ठांनी मार्गदर्शन केले तर त्यांचे भविष्य घडेल आणि देशाचे हित जोपासले जाईल. समाजातील सर्वच घटकांनी युवकांच्या कार्यास प्रेरणा द्यावी. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असेही सांकला म्हणाले.
उद्घाटनक मनोहरलाल लोढा म्हणाले की, युवकांनी स्वयंप्रेरणेने सर्वच क्षेत्रात पुढे आले पाहिजे. पुढाकार घेणारे युवकच प्रगतीशील समाजाचा चेहरा असतात. जैन समाज उद्योग, व्यापार करणारा समाज म्हणून देशभर ओळखला जातो. परंतू आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षेत देखील जैन युवकांचे प्रति निधीत्व वाढत असल्याचे दिसते. तसेच संशोधन व उच्च शिक्षण या क्षेत्रात देखील जैन युवकांसाठी संधी आहेत. त्याचा लाभ युवकांनी घेतला पाहिजे.
प्रास्ताविक करताना निमंत्रक नितीन बेदमुथा म्हणाले की, समाजासाठी चांगले कार्य करायचे आहे. मात्र हे कार्य शाश्वत असावे, एका पिढीकडून दुस-या पिढीने ते सहज स्वीकारून सुरू ठेवावे, असा ध्यास आहे. त्याच अनुषंगाने प्रथमच युवकांचे राष्ट्रीय संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केले होते. देशातील निवडक ज्येष्ठ उद्योजकांचे मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळावे आणि त्यांच्या अनुभवातून युवक पिढी समृध्द व्हावी या उद्देशाने निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ काम करीत आहे. समाजहिताचे हे कार्य पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित व्हावे हा हेतू संमेलन घेण्यामागे आहे.
यावेळी नवीन शाखा पदाधिका-यांचा शपथविधी, विशेष सेवाकार्य केलेल्या शाखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी पारस मोदी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. सुखलाल लोढा, मनोहरलाल लोढा, पवनकुमार लोढा, नितेशकुमार लोढा, पृथ्वीराज लोढा यांनी विशेष सहकार्य केले. शारदा चोरडीया यांनी सूत्रसंचालन केले. आभार तुषार मुथा यांनी मानले.














