न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभापती विलास मडिगेरी यांना महामेट्रोच्या बाऊंन्सर’नी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मंगळवार (दि. १० जुलै) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी कामानिमित्त महापालिकेच्या आवारात आले असता, महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकातून महापालिकेत जात होते.
त्या ठिकाणी मेट्रोचे काम चालू होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी मडिगेरी यांना वाहन पुढे नेण्यास मज्जाव करीत त्यांच्याबरोबर वाद घातला होता व दमदाटी केली होती. त्यामुळे महामेट्रो प्रशासन जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करत नाही, तोपर्यंत त्यांचे काम बंद करण्यात यावे, अशी भूमिका मडिगेरी यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली होती.
याबाबत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मडिगेरी यांची भेट घेत, झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. मात्र, महामेट्रोकडून आपत्कालीन कृती आराखडा आणि रस्ता सुरक्षा अहवाल पालिकेला सुपूर्द करेपर्यंत महामार्गावर सुरू असलेले महामेट्रोचे काम बंद ठेवावे, असे लेखी पत्र सहशहर अभियंता राजन पाटील यांनी महामेट्रो प्रशासनाला दिले.
महामेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद करताना वाहतूक विभाग, महापालिका परवाने, परवान्यातील सुचनांचे तंतोतंत पालन होईपर्यंत तसेच महामेट्रोकडून आपत्कालीन कृती आराखडा आणि रस्ता सुरक्षा अहवाल सुपूर्द करेपर्यंत महामार्गावर सुरू असलेले महामेट्रोचे काम बंद ठेवावे, असे या पत्रामध्ये नमूद केले आहे.











